महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील सर्व बौद्धांचे धार्मिकस्थान सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे. बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे हा नैसर्गिक न्याय ठरेल. “महाबोधी महाविहाराचा” ताबा बौध्दांना मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर 12 फेब्रुवारीपासून देशभरातील विविध बौद्ध संघटनांचे मोठे आंदोलन सुरु आहे. भारतीय व जागतिक बौद्ध संघटना बुद्धगया महाबोधी महाविहाराजवळ बुद्धगया महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांना सोपवण्यासाठी निदर्शने करित आहेत. महाबोधी महाविहाराचा ताबा बौध्दांना न मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, बुद्धगया मंदिर कायदा 1949 या कायद्यामध्ये महाबोधी विहाराला “मंदिर” म्हणून उल्लेखित करण्यात आले आहे. या कायद्यात अशी तरतूद आहे की, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन पाहण्यासाठी व प्रत्येक निर्णय घेण्यासाठी नऊ सदस्यीय समिती असेल. या नऊ सदस्यापैकी पाच सदस्य हिंदू असतील व उर्वरित चार सदस्य बौद्ध असतील. या नऊ सदस्यीय समितीमध्ये एक सदस्य गया जिल्ह्याचा जिल्हादंडाधिकारी असेल व तोच या समितीचा अध्यक्ष सुद्धा असेल त्या पुढे जाऊन हा कायदा म्हणतो की, जर गया जिल्ह्याचा जिल्हादंडाधिकारी हा गैरहिंदू असेल तर तो या समितीचा अध्यक्ष होऊ शकणार नाही. सरकार एकूण सदस्यापैकी, अध्यक्ष म्हणून हिंदूचीच निवड करेल. त्यानंतर या कायद्यानुसार समितीची बैठक घेण्यासाठी, विहाराबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी कमीतकमी 4 सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे. समितीवर 5 सदस्य हिंदूच असतात, म्हणजे उरलेले 4 बौद्ध सदस्य नसले तरी विहाराबाबतचा प्रत्येक निर्णय घेतला जातो. हेच त्यामागचे सर्वात मोठे कारण ! या कायद्यामध्ये मध्ये 5 गैर-बौध्द सदस्यांना ठेवणे हा बौध्द धम्माचा उघड-उघड अपमानच नाही तर अन्याय देखील आहे. विशेषतः एका शैव महंत ब्राह्मणाला समितीवर ठेवणे हा बौद्ध धम्माचा अपमान आहे. कारण आदि शंकराचार्यानी बौद्धधम्माविरुद्ध हिंसाचाराची मोहीम सुरू केली होती. त्याच ब्राह्मणांना महाबोधी महाविहार ताब्यात देणे हा न्याय आहे का? जर हिंदू धर्माचे देवळातील व्यवस्थापन हिंदू धर्मिय लोकांकडे, मुस्लीमांच्या मश्चिदीचे व्यवस्थापन मुस्लीमांकडे, चर्चचे व्यवस्थापन ख्रिश्चनांकडे, गुरुद्वाराचे व्यवस्थापन शिख लोकांकडे तर बौध्दांच्या महाबोधी महाविहाराचा संपूर्ण ताबा बौध्दांकडे का नाही? संविधानातील “सार्वभौम” हा शब्द सर्व धर्मियासाठी लागू व्हावा संशोधक फ्रान्सिस बुकाननच्या कागदपत्रावरून महंत ब्राह्मणांची कोठी ही सम्राट अशोकाच्या राजवाड्यावर बांधलेली असल्याचे ऐतिहासिक पुरावे सिद्ध होतात. या जागेचे उत्खनन करून ते राष्ट्रीय वारसा घोषित करावे. खरेतर भारताची खरी ओळख सम्राट अशोक यांच्यामुळेच आहे आणि महंतांच्या हवेलीत असलेल्या शाक्यमुनी तथागत बुद्धांच्या शेकडो मूर्ती आणि शिलालेख ताबडतोब बौध्दगया येथील संग्रहालयात स्थलांतरित केले पाहिजेत, अशी सरकारकडे मागणी करण्याची गरज आहे. महंतांच्या हवेलीत शेकडो बुद्ध मूर्ती आणि शेकडो बौद्ध राजांच्या नोंदी आहेत, हे स्वतःहून घडले का? चौथ्या शतकात आलेल्या फाड्यान आणि सातव्या शतकात आलेल्या व्हेनसांग यांच्या प्रवासवर्णनांवरून असे दिसून येते की, बौध्दगया महाबोधी महाविहारात कुठेही शिवमंदिर नव्हते व्हेनसांग यांच्या प्रवासवर्णनां वरून महाबोधी महाविहाराला एक दीर्घ पुरातन इतिहास असल्याचे दिसून येते. इ.स 600 च्या दरम्यान राजा शशांकने बोधिवृक्ष व महाविहारातील बुद्ध प्रतिमा तोडण्याचा आदेश दिला. त्याने बंगाल प्रांतातील अनेक बुद्धविहार आणि स्तूप तोडून टाकले होते. अतिशय शिताफीने कामरूपचा राजा भास्करवर्मन ने बुद्ध प्रतिमा आणि बोधिवृक्ष त्याच्या विश्वासू मंत्र्यांमार्फत वाचविले व साधारणतः इ.स. 620 मध्ये बोधीवृक्षाभोवती 24 फूट उंचीची भिंत बांधली. तसेच इ.स. 637 मध्ये हुयान त्सांग ने महाबोधी महाविहाराला भेट दिली. त्याच्या लेखात आलेला प्रवेशद्वार व भव्य मंडप हा त्याकाळी ब्रह्मदेशाचा राजा साडो याने बांधला होता. हुयान त्सांगच्या भेटीच्या आधी येथील फाल्गु (नेरंजना) नदीला पूर आला होता व त्याचे पाणी व वाळू संपूर्ण महाविहार परिसरात पसरली होती. महाविहारात अक्षरशः अडीच फूट उंच वाळू साचली होती व त्यात वज्रासन देखील दाबले गेले होते. हुयान त्सांग ने वर्णन केल्याप्रमाणे महाबोधी महाविहार 170 फूट उंच होते, बोधीवृक्षाच्या भोवती उंच भिंत होती व संपूर्ण बांधकाम प्लास्टर केलेल्या लाल रंगाच्या निळसर छटा असलेल्या विटांनी बनविले होते. महाविहाराच्या भिंतींवर अनेक ठिकाणी कोनाडे केले होते व त्यात सोन्याचा मुलामा असलेली बुद्धमूर्ती ठेवल्या होत्या. महाविहाराच्या पूर्वेला तीन मजली मंडप होता व त्याच्या आतील भिंतीवर सोन्या-चांदीने सजवलेली कलाकुसर होती. महाविहाराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रयाच्या 10 फूट उंच मूर्ती होत्या. बुद्धांच्या बुद्धगया येथील 7 आठवड्यांच्या वास्तव्यात त्यांनी ध्यानमग्नतेत व्यतीत केलेल्या प्रत्येक ठिकाणी सम्राट अशोकाने सुंदर कोरीव स्मृतिस्थळ बांधल्या होत्या. या व्यतिरिक्त अशोकाने अनेक ठिकाणी स्तूप बांधली ज्यात सुजाताने बुद्धांना ज्याठिकाणी खीर दिली, त्यात कश्यप बंधूंनी बुद्ध-धम्माची दीक्षा घेतली व मातीपोसक जातकाचे ठिकाण सामील होते. हे सर्व स्तूप 18 व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती, नंतर महंतांच्या अलिखित सूचनेनुसार तेथील गावकऱ्यांनी हे स्तूप पोखरून तेथील विटा काढून आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. कनिंघमला नंतर उत्खनन करतांना लाखेच्या अनेक मूर्ती सापडल्या. महाबोधी महाविहाराचे संवर्धनाचे काम अनेक राजांनी आणि असंख्य अनामिक दानदात्यांनी केले. त्याकाळी महाविहार भोवती जे नक्षीदार कुंपण अशोकाने बांधले होते त्यावर अनेकांनी शिलालेख कोरून ठेवले. एका शिलालेखात एका दानदात्याने 250 दिनार (गुप्तकालीन सोन्याचे नाणे) दान दिले. त्याचबरोबर महाविहार रोज दीप पूजनाच्या तुपासाठी 300 गाय महाविहाराला दान दिल्याचे दिसते तसेच 7 व्या शतकाच्या सुमारास इत्सिंगने महाबोधी महाविहास भेट दिल्याचे कळते. त्याने वर्णन केल्याप्रमाणे अनेक व्यापारी आणि राजांनी महाबोधी महाविहाराच्या स्वरंक्षण आणि संवर्धनासाठी अनेक गावे दान दिला होती. आता मात्र बीटीएमसीचे बौद्धेतर लोक विशेषतः ब्राह्मण महंत, त्यांच्या ब्राह्मण कर्मचाऱ्यांद्वारे बुद्धाच्या पाच मूर्तीना पांडव म्हणून प्रचार करत आहेत आणि पवित्र महाबोधी महाविहाराच्या व्हरांड्यात एका खोलीत शिवलिंग स्थापित करून हा आंतरराष्ट्रीय वारसा हडप करू इच्छितात. बौध्दगया ही केवळ बिहार किंवा भारताचीच नव्हे तर जगाचीही अभिमानाची गोष्ट आहे. बौध्दगया ही जागतिक वारसा आहे. ‘महाबोधी महाविहार मंदिर कायदा 1949’ मुळे हे पवित्र स्थान मनुवादी लोकांकडून बळकावले जात आहे. बिहार राज्याचे राज्यपाल आर्लेकर यांनीही बौध्दगया येथे येऊन महंत ब्राह्मणांच्या ताब्यातील जागा बौध्दगया शिवालय म्हणून ओळखली आहे. त्यामुळे राज्यपालपद भूषविणाऱ्या व्यक्तीला हे शोभत नाही. त्यांच्यावरही कठोर कारवाई झालीच पाहिजे.जर बौध्दांना महाबोधी महाविहाराचा ताबा मिळवायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा हा कायदा रद्द होणे गरजेचे आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी बौध्दांना आवाज उठवावा लागेल, आंदोलन करावे लागेल. महाबोधी महाविहाराला पाखंड्यांपासून मुक्त करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी, देशव्यापी जेलभरो आंदोलने सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. म्हणून ‘बुद्धगया महाबोधी महाविहार मंदिर कायदा 1949’ तात्काळ रद्द करावा आणि हे पवित्र बौद्ध स्थळ भारतातील बौद्धांना सोपविण्यासाठी एक नवीन कायदा करावा, अशी सर्वतोपरी मागणी उचलून धरावी लागेल. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर देशभर तीव्र निषेध सुद्धा होऊ शकतो. भविष्यात श्रृंखलाबंद न्यायिक आंदोलनाचे स्वरुप, जाळपोट, धरणे, आंदोलने, रॅली प्रदर्शने आणि शेवटी बौध्दगया येथे लाखो लोकांचा एक मोठा मेळावा होऊ शकतो. जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल..!